अमरावतीत पाईपलाईनच्या खोदकामात शेकडो झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्याने नागरिक संतप्त
अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी लेहगाव–मोर्शी–सिंभोरा धरण मार्गावर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. इंद्रजीत इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या
पाईपलाईनच्या खोदकामात शेकडो वृक्षांना धोका; झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्याने संताप


अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी लेहगाव–मोर्शी–सिंभोरा धरण मार्गावर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. इंद्रजीत इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या झाडांच्या मुळ्या पोकलँड मशीनच्या सहाय्याने उघड्या पाडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अमरावती–पाढर्णा राज्य महामार्गाचे सिमेंट काँक्रिटचे काम सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कडुनिंबासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत ही झाडे चांगली वाढली असून रस्त्याला हिरवाईचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र, पाईपलाईनसाठी खोदकाम करताना अनेक झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.काही ठिकाणी पोकलँड मशीनच्या सहाय्याने झाडांना नुकसान पोहोचवून लगेचच खोदलेला भाग मातीने बुजविण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शासनाकडून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे विकासकामांच्या नावाखाली संगोपन केलेल्या वृक्षांचे नुकसान होत असल्याने नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

वृक्षांनी नटलेला हा राज्य मार्ग भविष्यात भकास होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रवाशांना उन्हापासून विसावा मिळण्यासाठी असलेली हिरवाई नष्ट होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाची परवानगी घेऊनच झाडांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.लेहगाव ते शिरखेड, निंभी मार्गावर वाढीव पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू असले तरी विकासकाम करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून झाडांच्या नुकसानीची चौकशी करावी, अनधिकृतपणे झाडे तोडली असल्यास संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी आणि नुकसान झालेल्या वृक्षांचे पुनर्रोपण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande