

रायगड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन व जलसंधारण विभागाच्या वतीने अलिबाग बीच येथे ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात आला. रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात केली.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांना जलसंधारणाची शपथही देण्यात आली. त्यानंतर अलिबाग बीच येथून सुरू झालेली वॉकेथॉन बालाजी मंदिर, छत्रपती शिवाजी चौक, ठिकरूळ नाका, रायगड बाजार, अलिबाग बसस्थानक, अलिबाग नगर परिषद व बालाजी नाका मार्गे पुन्हा अलिबाग बीच येथे समाप्त झाली.
यावेळी बोलताना पालकमंत्री गोगावले यांनी पाणी हे केवळ वर्तमानाची गरज नसून पुढील पिढीचे भविष्य असल्याचे सांगितले. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जलसंधारण सप्ताह’ आणि ‘जलसंधारण अभियान’ाच्या माध्यमातून हा संदेश गावागावांत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो’ ही या अभियानाची थीम आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विविध क्रीडा व जलतरण स्पर्धांतील तसेच वॉकेथॉनमधील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)