
अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। घाटलाडकी येथील बहुप्रतीक्षित प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वातंत्र्यदिनी ऑनलाइन पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रवीण तायडे होते.
कार्यक्रमाला बियाणे महामंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोरडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक बनसोड, घाटलाडकीचे सरपंच शिवानंद मदने, उपसरपंच अब्दुल हफीज, शिरसगाव मंडळ तालुका अध्यक्ष हर्षद धुळे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष जयश्री पंडागळे, भाजप तालुका अध्यक्ष रमेश तायवाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी पारिसे, जिल्हा परिषद अभियंता नितीन झगडे, तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला डकरे तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घाटलाडकी गावातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
घाटलाडकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यामुळे घाटलाडकीसह परिसरातील सुमारे १० ते १५ गावांतील नागरिकांना आरोग्यसेवेचा थेट लाभ मिळणार आहे. प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी तसेच विविध आरोग्यविषयक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
दुर्गम भागातील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी दूरच्या आरोग्य केंद्रांवर जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, नव्या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील आरोग्य यंत्रणेला अधिक बळकटी मिळणार आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी