
जळगाव, 21 ऑगस्ट, (हिं.स.) जिल्हा प्रशासन जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जिल्हा क्रीडा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आयोजन व नियोजनाबाबत क्रीडा संघटकांची सभा छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे संपन्न झाली.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समन्वयाने आयोजित या सभेत दि. २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित शालेय राष्ट्रीय स्पर्धा तसेच विविध अधिकृत क्रीडा संघटनांनी आयोजित केलेल्या मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात सन्मान करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. तसेच सन २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत १२ खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचाही सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले.
जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला वेगळी उंची मिळवून देणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त क्रीडा महर्षींचा सन्मान करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. पुरस्कारप्राप्त क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाचा उदयोन्मुख खेळाडूंना लाभ मिळावा, यासाठी त्यांच्यासोबत संवादसत्र आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानाचे आयोजनही राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंनी आपली प्रमाणपत्रे तसेच टी-शर्टचा आकार याबाबतची माहिती २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी इक्बाल मिर्झा, फारुख शेख, प्रशांत कोल्हे, रणजीत पाटील, अनिल माकडे, श्रीमती कांचन नारखेडे, कांचन विसपुते यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा संघटक व मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर