
नांदेड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। “माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित भविष्य घडवा”, “जल है तो कल है”, “आजचे पाणी संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य” आणि “पाणी आडवा, पाणी जिरवा” अशा जलसंधारणाच्या संदेशांनी शुक्रवारी नांदेड शहर दुमदुमून गेले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलसंधारण दिन आणि महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.
शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार जयाताई चव्हाण, महापौर कविताताई मुळे, कुलगुरू मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे, मृद व जलसंधारण अधीक्षक अभियंता अजित परांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाने, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महावॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, नागरिक आणि स्वयंसेवकांना जलसंधारण दिनाची शपथ देण्यात आली. जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महावॉकेथॉनमध्ये नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालय, महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, राजर्षी शाहू महाराज हायस्कूल वसंतनगर, केंब्रिज हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, पीपल्स हायस्कूल, के.आर.एम. महाविद्यालय, सम्राट अशोक हायस्कूल, एनएसबी कॉलेज, गुजराती हायस्कूल यांसह विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामांची चित्रप्रदर्शनीही आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून जलसंधारण, मृदसंवर्धन आणि पाण्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रिल स्पर्धेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन स्पर्धेची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अधिकाधिक तरुणांनी आपल्या कल्पनांना वाव देत या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता अनिल कांबळे यांनी केले.
शासकीय तंत्रनिकेतन मैदानापासून सुरू झालेली सुमारे 3 किलोमीटरची महावॉकेथॉन व्हीआयपी रोड, महात्मा फुले चौक, डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल मार्गे पुन्हा शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे पोहोचली. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात केली. यावेळी मान्यवरांनी स्वतःही महावॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.
महावॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांसाठी ईश्वरचिठ्ठीद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देशमुख आणि विष्णू गोडबोले यांनी केले, तर आभार कार्यकारी अभियंता अनिल कांबळे यांनी मानले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis