
अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत वयस्कर तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.
‘प्रमाणीकरण शक्य नाही’ पर्यायाचा वापर
योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या माध्यमातून पोर्टलवर संबंधित शेतकऱ्याच्या कर्जाची माहिती पाहता येणार आहे.
कर्जाची माहिती योग्य असल्याची नोंद केल्यानंतर बोटांच्या ठशांद्वारे आधार प्रमाणीकरण केले जाईल. एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास संबंधित शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा लागणार आहे.
त्यानंतरही आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही, तर सेवा केंद्र चालकाने पोर्टलवरील ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटाच्या ठशाद्वारे आधार प्रमाणीकरणाची पुढील प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
तहसील कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकरण ऑनलाइन पद्धतीने तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा तसेच स्वतःची ओळख निश्चित करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
तालुकास्तरीय समितीमार्फत या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित केली जाणार आहे. शेतकऱ्याचा आधार क्रमांक योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समितीमार्फत प्रकरण मंजूर करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
या स्वतंत्र कार्यपद्धतीमुळे वयस्कर, शारीरिक कारणांमुळे बोटांचे ठसे न उमटणारे तसेच आधार प्रमाणीकरणात अडचणी येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी