
अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। बडनेरा येथील अवैध सावकारीविरोधात उपनिबंधक, सहकारी संस्था विभागाने गुरुवारी सकाळी धडक कारवाई केली. चार पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल ४३ संशयास्पद दस्तऐवज जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था राजेश भुयार यांच्याकडे बडनेरा येथील काही व्यक्तींकडून अवैध सावकारीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे सहकारी संस्था विभागाने कारवाईचे नियोजन केले.
सहायक निबंधक प्रीती धामणे, दीपक गासे, चेतना कुचे, अमोल लोमटे, तसेच पथकप्रमुख किशोर इंगळे आणि सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या पथकांनी बडनेरा पोलिसांच्या सहकार्याने विविध ठिकाणी झडती घेतली.
सुभाष चौकातील एका महिलेच्या घरी झडती घेतली असता ३४ संशयास्पद दस्तऐवज आढळून आले. यामध्ये स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, इसारचिठ्ठी, खरेदीखत, कोरे स्टॅम्प आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
दरम्यान, नवी वस्ती येथील कन्हैयालाल शर्मा यांच्या घरी केलेल्या झडतीत आणखी ९ संशयास्पद दस्तऐवज आढळले. त्यामध्ये शेतकऱ्यांचे सातबारा उतारे आणि इसारचिठ्ठ्यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कन्हैयालाल शर्मा, मनोहरलाल शर्मा आणि आशिष शर्मा यांच्या सुभाष चौकातील घरासह धानोरा जोग रस्त्यावरील फार्महाऊसचीही झडती घेण्यात आली. मात्र, या ठिकाणी कोणतेही संशयास्पद दस्तऐवज आढळून आले नाहीत.
जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सध्या चौकशी सुरू असून, त्यामध्ये अवैध सावकारीशी संबंधित व्यवहार आढळून येतात का, याची तपासणी केली जात आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी