
सोलापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. नीलकंठ मठपती यांच्याकडे नगर अभियंता पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या स्वाक्षरीने 20 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भातील कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, नगर अभियंता पदाचा कार्यभार सांभाळत असताना सारिका आकुलवार यांच्यावर नालेसफाईच्या कामात गैरप्रकार आणि आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप करण्यात आले होते. नगरसेवक अनंत जाधव यांनी कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचा दावा करण्यात आला होता. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी सातत्याने केली होती.
नालेसफाईच्या कामातील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली होती. या चौकशी समितीच्या अहवालात सारिका आकुलवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या नगर अभियंता पदाच्या जबाबदारीत बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या अधिकृत आदेशानुसार, नीलकंठ मठपती यांच्याकडे नगर अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर सारिका आकुलवार यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडे बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे परिवहन विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
या प्रशासकीय फेरबदलामुळे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील कामकाजात आगामी काळात कोणते बदल होतात, याकडे लक्ष लागले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड