
जीएस निवडणुका पुन्हा सुरू करण्यासह जेन झेड संघटन आणि युवा सदस्य नोंदणीवर भर
सोलापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार होते; मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतरही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, राजेश पांडे, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
बैठकीला एसआयआर महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, एसआयआर प्रदेश संयोजक किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार मनोज घोरपडे, आमदार राहुल कुल, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार काका प्रदेश सचिव राम सातपुते, आमदार समाधान आवताडे तसेच माजी आमदार दिलीप माने उपस्थित होते.
बैठकीचे पहिले सत्र पार पडल्यानंतर दुसरे सत्र सुरू असतानाच हॉटेल बालाजी सरोवर येथे भाजपमधील युवा कार्यकर्ते आणि भावी नेतृत्व मानल्या जाणाऱ्या युवा नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली. हॉटेलच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये झालेल्या या बैठकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या बैठकीला भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्य राणा पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक, आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव व बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत तसेच तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील सहभागी झाले.
बैठकीत विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांमधून निवडल्या जाणाऱ्या जीएस पदाच्या निवडणुका मागील अनेक वर्षांपासून झालेल्या नाहीत, यावर चर्चा झाली. या निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची भूमिका युवा नेत्यांनी व्यक्त केली.
याशिवाय शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट, जेन झेडमध्ये संघटन मजबूत करणे आणि नव्या युवा सदस्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यावर विशेष भर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आगामी काळात युवा वर्गाशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्यासाठी संघटनात्मक पातळीवर नियोजन करण्यावरही चर्चा झाली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड