
सोलापूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. पाण्याच्या प्रश्नामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, या प्रश्नावर कोण गांभीर्याने पाठपुरावा करीत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर सोलापूरच्या पाणी प्रश्नावर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख किती गांभीर्याने लक्ष देत आहेत, याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. उत्तर सोलापूरशी संबंधित बैठका, प्रशासनाकडे करण्यात आलेला पाठपुरावा तसेच पाण्याच्या प्रश्नासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे.
विशेष म्हणजे, बळीराम काकांच्या समर्थकांकडूनही सुभाष बापू देशमुख यांच्या या प्रयत्नांची दखल घेतली जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. उत्तर सोलापूरच्या विविध प्रश्नांवर आमदार देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काही कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर पूर्वी वेगवेगळ्या राजकीय विचारधारांशी जोडलेले असलेले काही कार्यकर्तेही सुभाष बापू देशमुख यांच्या पाणी प्रश्नावरील भूमिकेची दखल घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रश्न हा तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या विषयांपैकी एक बनला असून, आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय हालचाली आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड