अमरावती शहरात ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘वॉक फॉर वॉटर’मधून जलसंवर्धनाचा संदेश
नागरिक, विद्यार्थी व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। जनसामान्यांपर्यंत जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी अमरावती शहरात सकाळी ‘महा वॉकेथॉन : वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. ‘एक पाऊल जलसंधारणासाठी, एक पाऊल शाश्वत भ
‘ महा वॉकेथॉन’ला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ‘वॉक फॉर वॉटर’मधून जलसंवर्धनाचा संदेश;


नागरिक, विद्यार्थी व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग

अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। जनसामान्यांपर्यंत जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी अमरावती शहरात सकाळी ‘महा वॉकेथॉन : वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. ‘एक पाऊल जलसंधारणासाठी, एक पाऊल शाश्वत भविष्यासाठी’ हा संदेश देत काढण्यात आलेल्या या वॉकेथॉनला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथून झाला. वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश देणारे फलक हातात घेत जनजागृती केली.

वॉकेथॉनचा मार्ग श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथून गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवनमार्गे पुन्हा श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय असा होता. याच ठिकाणी वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे, असा संदेश या वॉकेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला. नागरिकांच्या सहभागामुळे जलसंवर्धनाच्या जनजागृतीला बळ मिळाले.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande