परभणीत चाइल्ड व १८ वी मिनी राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेला सुरुवात
२८ जिल्ह्यांतील सुमारे ३७० खेळाडूंचा सहभाग परभणी, २१ ऑगस्ट (हिं.स.)। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमच्या बॅडमिंटन हॉलमध्ये शुक्रवारी ७ वी चाइल्ड व १८ वी मिनी राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते उत
राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेचे परभणीत उद्घाटन २८ जिल्ह्यांतील सुमारे ३७० खेळाडूंचा सहभाग


२८ जिल्ह्यांतील सुमारे ३७० खेळाडूंचा सहभाग

परभणी, २१ ऑगस्ट (हिं.स.)। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमच्या बॅडमिंटन हॉलमध्ये शुक्रवारी ७ वी चाइल्ड व १८ वी मिनी राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते उत्साहात झाले. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमधून सुमारे ३७० खेळाडू सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑलिम्पिक निरीक्षक तथा छत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. उदय डोंगरे, राज्य उपाध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश काटोळे, तसेच शेषनारायण लोढे, दत्ता गलाले, राजू शिंदे व केदार ढवळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. डी. वाय. पाटील व प्रा. रमाकांत बनसोडे यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक पंकज कुमावत म्हणाले की, लहान वयापासूनच खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धांचा अनुभव मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अनुभवाच्या बळावर भविष्यात हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करतील. तलवारबाजीसारख्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेचे संयोजक तथा जिल्हा सचिव प्रा. डॉ. पांडुरंग रानमाळ यांनी स्वागतपर भाषणातून राज्यभरातून परभणीत दाखल झालेल्या खेळाडूंचे स्वागत केले. महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. उदय डोंगरे यांनी प्रास्ताविकातून तलवारबाजी खेळाचा इतिहास व त्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील देशमुख यांनी केले, तर गोविंद शर्मा यांनी आभार मानले. स्पर्धेचे संचालक म्हणून वजीरुद्दीन काझी, विजय गाडेकर, सागर मगरे व शतुषार आहेर काम पाहत आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande