इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तिसऱ्या कॅप फेरीसाठी २२ ऑगस्टपर्यंत ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी
सोलापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तिसऱ्या कॅप फेरीसाठी (थर्ड कॅप राऊंड) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 20 ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुरू आहे. विद्यार्थ्या
Jdjs


सोलापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तिसऱ्या कॅप फेरीसाठी (थर्ड कॅप राऊंड) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 20 ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुरू आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी स्वेरी अभियांत्रिकीच्या स्क्रूटीनी सेंटर (एस.सी. क्रमांक 6220) येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन पूर्ण केले आहे, तसेच प्रथम किंवा द्वितीय प्रवेश फेरीत बेटरमेंट केले आहे किंवा अद्याप ज्यांना जागा वाटप झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या कॅप फेरीचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक तथा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.

प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन, अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची तपासणी, पडताळणी आणि निश्चितीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. आता प्रथम व द्वितीय फेरीप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य महाविद्यालय किंवा पसंतीच्या शाखेचे प्राधान्यक्रम तिसऱ्या कॅप फेरीत ऑनलाइन भरावे लागणार आहेत.

कॅप राऊंड-3 चा ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय आणि शाखेची निवड काळजीपूर्वक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयाची प्रवेशक्षमता, विद्यार्थ्यांचे परीक्षेतील निकाल, कॅम्पस प्लेसमेंट, वसतिगृह सुविधा, उपलब्ध सोयी-सुविधा, उच्चशिक्षित प्राध्यापकवर्ग, संशोधन कार्य आणि मानांकने आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

कॅप राऊंड-3 दरम्यान स्वेरीच्या वतीने मोहोळ, मंगळवेढा, टेंभुर्णी, सोलापूर, बार्शी, अकलूज आणि धाराशिव येथे प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी स्वेरीचे तज्ज्ञ प्राध्यापक आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

या मोफत सुविधेचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी सोमवार, 24 ऑगस्ट 2026 रोजी, तर थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी मंगळवार, 25 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

तिसऱ्या फेरीतील जागावाटपानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करून शुल्क भरावे लागणार असून, त्यानंतर प्रवेश निश्चित करता येणार आहे.

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. उत्तम अनुसे (9168655365) किंवा प्रा. पोपट आसबे (7821004647) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande