
रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
१५ मार्च २०२४ रोजीच्या संचमान्यता शासन निर्णयाच्या अनुषंगाने पदवीधर शिक्षकांचे उपशिक्षक पदावर झालेले समायोजन, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गणित-विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी यांसह विविध प्रश्नांवर शिक्षक समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र या प्रश्नांवर वर्षभराचा कालावधी उलटूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शिक्षक समितीने केला आहे.
शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या आणि प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे जिल्हाव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी