
निविदा न उघडल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा
अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत तांडा वस्ती विकास योजनेतील सुमारे ३३ लाख रुपयांच्या विकासकामांची निविदाप्रक्रिया मागील १५ दिवसांपासून रखडली आहे. निविदा सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप निविदा उघडण्यात आलेली नसल्याने या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्यामार्फत तांडा वस्ती विकास योजनेंतर्गत विविध विकासकामांसाठी ३३ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. निविदा सादर करण्याची मुदत पूर्ण होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला, तरी निविदा उघडण्यात आलेली नाही. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये नाराजी असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
निविदा ‘मॅनेज’ करण्याचा आरोप
सूत्रांच्या माहितीनुसार, निविदाप्रक्रियेत कंत्राटदारांमध्ये स्पर्धा झाल्याने ही कामे कमी दरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निविदा ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा कंत्राटदारांमध्ये आहे. मात्र, या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
निविदा वेळेत न उघडल्याने प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला असून, त्यातून आर्थिक गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचा आरोप काही कंत्राटदारांनी केला आहे. सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार कमी दराने काम करण्यास तयार असतानाही निविदा प्रक्रिया रखडवून त्यांना संधी नाकारली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील काही कंत्राटदारांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. निविदाप्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली असून, शासकीय कंत्राटदारांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येत्या दोन दिवसांत निविदा उघडण्यात आल्या नाहीत, तर गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून निविदाप्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशी मागणी कंत्राटदारांसह नागरिकांकडून होत आहे. याबाबत पंचायत समिती नांदगावचे विस्तार अधिकारी विनोद कांबळे म्हणाले, “तांडा वस्तीच्या कामाची निविदाप्रक्रिया काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही तांत्रिक बाबी आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर लवकरच निविदा उघडण्यात येईल.”
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी