
विहंगम योग संत समाजातर्फे आयोजन
राष्ट्र, संस्कृती आणि अध्यात्माशी जोडण्याचा संदेश
नाशिक, 21 ऑगस्ट (हिं.स.)। विहंगम योग संत समाजाचा १३ वा वार्षिकोत्सव यंदा ‘समर्पण दीप अध्यात्म महोत्सव’ या स्वरूपात १४ आणि १६ डिसेंबर २०२६ रोजी स्वर्वेद महामंदिर धाम, वाराणसी येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या पावन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विहंगम योगाचे उत्तराधिकारी सुपूज्य संत प्रवर विज्ञानदेवजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ‘समर्पण दीप’ राष्ट्रव्यापी दिव्य संदेश यात्रा सुरू करण्यात आली आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही संदेश यात्रा सुरू असून, तिचे नाशिक शहरात २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आगमन होणार आहे. मंडलिक नगर, आसाराम बापू पुलाजवळ, केन्सिंग्टन क्लबच्या मागे, चांदसी येथील अलास्का बॅन्क्वेट हॉल अँड लॉन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
प्रत्येक नागरिकाला राष्ट्र, संस्कृती आणि अध्यात्माप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणे तसेच समाजाला सेवा आणि समर्पणाच्या भावनेशी जोडणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तीन महान संकल्पांचा संदेश
या यात्रेद्वारे वीर सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, गोसेवेला प्रोत्साहन देऊन भारताच्या करुणा परंपरेला बळकटी देणे तसेच संस्कार, चारित्र्य आणि सनातन ज्ञानपरंपरेचे वाहक असलेल्या गुरुकुलांच्या संरक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे.
‘आत्मजागरणातून राष्ट्रजागरणाकडे आणि आत्मशांतीकडून विश्वशांतीकडे’ समाजाला घेऊन जाण्याचा संकल्प या यात्रेतून मांडण्यात येत आहे.
दरम्यान, वाराणसी येथे होणाऱ्या वार्षिकोत्सवात २५ हजार कुंडी स्वर्वेद ज्ञान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूज्य संत प्रवर विज्ञानदेवजी महाराज यांची दिव्यवाणी, त्यांच्या पावन उपस्थितीत ध्यान-साधना तसेच महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आध्यात्मिक आणि भौतिक उत्कर्ष साधावा, असे आवाहन नाशिक विहंगम योग संत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI