समृद्धी महामार्गावर ट्रक चालकांची रेस; ओव्हरटेकच्या नादात प्रवाशांना नाहक त्रास
अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.) | समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक चालकांच्या बेजबाबदारपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्ध्याजवळ तीन ट्रक चालकांनी चक्क एकमेकांमध्ये रेस लावल्याचे दिसून आले. एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक च
समृद्धी महामार्गावर ट्रक चालकांची रेस ओव्हरटेकच्या नादात प्रवाशांना नाहक त्रास


अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.) | समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक चालकांच्या बेजबाबदारपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्ध्याजवळ तीन ट्रक चालकांनी चक्क एकमेकांमध्ये रेस लावल्याचे दिसून आले. एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक चालकांनी महामार्गावरील इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा न दिल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर तीन ट्रक भरधाव वेगाने एकाच दिशेने जात होते. यावेळी एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्या ट्रकनेही वेग वाढवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तिन्ही ट्रक एकमेकांमध्ये स्पर्धा करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. विशेष म्हणजे, ओव्हरटेक करताना इतर वाहनांना जाण्यासाठी आवश्यक अंतर न ठेवल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांची मोठी कोंडी झाली.

समृद्धी महामार्गावर वाहनांना वेगाची मर्यादा असतानाही काही जड वाहनचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. ट्रकसारख्या अवजड वाहनांनी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यास अपघाताची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत एखाद्या वाहनाचा ताबा सुटल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रकारामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जड वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित यंत्रणेने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. महामार्ग प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन संबंधित ट्रक चालकांची ओळख पटवून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.समृद्धी महामार्गावर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून वाहनांवर लक्ष ठेवून नियम तोडणाऱ्या चालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande