
अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील येरला ग्रामपंचायतीच्या गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने येरला ग्रामपंचायतीच्या नवीन पिण्याच्या पाणी योजनेसाठी अप्पर वर्धा प्रकल्पातील बिगर-सिंचन पाणी आरक्षित करण्यास मंजुरी देणारा शासन निर्णय जारी केला आहे.
येरला गावाच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी मोठी विहीर असून, त्याठिकाणी पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. या विहिरीतूनच गावाला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, कालांतराने विहिरीकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात घाण निर्माण झाली. परिणामी गावकऱ्यांना दूषित पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागला. त्यातच पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती.
येरला गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य यांनी नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून येरला येथील माजी सरपंच सुहास ठाकरे यांच्या शेतात ७५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली.
दरम्यान, अप्पर वर्धा प्रकल्पालगतच्या नशीरपूर गावाजवळील विहिरीतून पाइपलाइनद्वारे पाणी आणून सध्या या टाकीत साठविले जाते. त्यानंतर या टाकीतून येरला गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पातून मिळणार पाणी
आता शासनाने अप्पर वर्धा प्रकल्पातील बिगर-सिंचन पाणी येरला ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाणी योजनेसाठी आरक्षित करण्यास मंजुरी दिल्याने गावकऱ्यांच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर येरला गावातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी होत असलेली नागरिकांची भटकंती थांबण्याची शक्यता आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी