रत्नागिरी : ट्रेडिंगच्या आमिषाने महिलेला ११.३७ लाखांचा गंडा
रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून रत्नागिरीतील एका महिलेसह तिच्या पतीची ११ लाख ३७ हजार १४ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस
रत्नागिरी : ट्रेडिंगच्या आमिषाने महिलेला ११.३७ लाखांचा गंडा


रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून रत्नागिरीतील एका महिलेसह तिच्या पतीची ११ लाख ३७ हजार १४ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून ते २३ जुलै २०२६ या कालावधीत कुवारबाव, रत्नागिरी येथे ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित महिलेने १८ ऑगस्ट रोजी रात्री सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, महिलेच्या पतीची व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोनल जगन्नाथ नाईक नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. या व्यक्तीने विश्वास संपादन करून ‘Julius Baer Mobile’ या ट्रेडिंग ॲप्लिकेशनवर लॉगइन करण्यास सांगितले. त्यानंतर IPO आणि OTC ट्रेडिंगच्या माध्यमातून कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले.

यानंतर सोनल नाईक हिने विविध व्हॉट्सॲप क्रमांकांवरून दाम्पत्याशी संपर्क साधत वेगवेगळ्या कारणांसाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. कुणाल सुमया नावाच्या व्यक्तीने स्वतःला संबंधित ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख असल्याचे भासवून कंपनीच्या नियमानुसार संपूर्ण रक्कम भरावी लागेल, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या आमिषाला बळी पडून फिर्यादीच्या संयुक्त आयसीआयसीआय बँक खात्यातून ११ लाख १७ हजार १४ रुपये ५८ पैसे, तर तिच्या पतीच्या आयसीआयसीआय एनआरआय बँक खात्यातून २० हजार रुपये, अशी एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये ५८ पैसे रक्कम भामट्यांनी घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियममधील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल जगन्नाथ नाईक आणि कुणाल सुमया अशी संशयितांची नावे असून कुणालचा पत्ता अद्याप उपलब्ध नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande