विविध विकासकामांच्या माध्यमातून लासलगावचा सर्वांगीण व शाश्वत विकास करणार - छगन भुजबळ
विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न नाशिक, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। लासलगाव शहर व परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच शहराच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यात येतील
Comprehensive and sustainable


विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न

नाशिक, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। लासलगाव शहर व परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच शहराच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यात येतील. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारे, विद्युत व्यवस्था, आरोग्य, शिक्षण आदी विविध सुविधांच्या माध्यमातून लासलगावचा सर्वांगीण, सुविधायुक्त व शाश्वत विकास करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लासलगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, सरपंच योगिता पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्यासह आदी शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, लासलगाव हे व्यापारी व कृषीविषयक दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येच्या तसेच नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करण्यात येणार आहे. या मार्गाच्या सुधारणेमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन कृषी व व्यापारी वाहतुकीला चालना मिळणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची सुधारणा, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, आवश्यक ठिकाणी गटारे व नाल्यांची बांधकामे, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना आणि स्वच्छतेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण, आवश्यक ठिकाणी नवीन जलवाहिन्या तसेच जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक पद्धतींचा वापर, कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे . लासलगाव नगर परिषद करण्याचा मानस असून ती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा श्रद्धा परंपरा आणि आध्यात्मिकतेचा महाकुंभ आहे. या कुंभमेळ्यानिमित देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे येतील. शिर्डी, लासलगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे परिसरातून नाशिकला येण्याऱ्या भाविकांसाठी हा मार्ग पर्यायी उपलब्ध होऊ शकणार आहे. शहरातील होणारी वाहतूक कोंडी दूर करून नागरिकांना सुरळीत, अत्याधुनिक, सुरक्षित व सुलभ रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता नागरिकांसाठी उद्याने, सार्वजनिक जागा, प्रकाश व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांचा विकास करण्याची गरज आहे. त्यानुसार उपलब्ध निधी आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करून टप्प्याटप्प्याने विकासकामे पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या रस्ते विकासासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल मंत्री भुजबळ यांनी त्यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande