पिंपळवंडीत न्यायासाठी जनसागर; चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची मागणी
पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी येथे १० वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री गावात हजारोंच्या उपस्थितीत मूक मोर्चा आणि शोकसभा
gfd


पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी येथे १० वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री गावात हजारोंच्या उपस्थितीत मूक मोर्चा आणि शोकसभा आयोजित करण्यात आली.

मोर्चादरम्यान नागरिकांनी चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. विविध संघटना आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. हातात फलक आणि मेणबत्त्या घेऊन नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवला.

या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आरोपीला २० दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी संतप्त मागणीही यावेळी करण्यात आली.

प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, अशीही मागणी करण्यात आली. चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिक आणि विविध संघटनांनी व्यक्त केला.

या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande