
पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्षाला आता निधीच्या मुद्द्यामुळे नवे वळण मिळाले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलेल्या पत्रावर सुहास टिंगरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. त्यानंतर भाजपकडून टिंगरे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांकडे वळविण्यात आला. त्यामुळे महापालिकेतील सत्तासमीकरण आणि भाजप-राष्ट्रवादीतील संघर्षाची चर्चा पुन्हा रंगली आहे.चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील पत्रप्रकरणात बालवडकर यांच्यानंतर टिंगरे यांचीही भूमिका भाजपच्या नाराजीचे कारण ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निधी वळविण्याच्या निर्णयामुळे या राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.स्थायी समितीतील या निर्णयामुळे संबंधित प्रभागांमधील विकासकामांसाठी मंजूर निधीच्या वाटपावरही राजकीय चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेतील निधीवाटपाचा मुद्दा आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु