
पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण आणि कर्णकर्कश आवाज रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या दिशेने पाऊल टाकत पुणे पोलिसांनी पोलिस आयुक्तालयात विविध प्रकारच्या साऊंड सिस्टिमची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान वेगवेगळ्या साऊंड सिस्टिममधून निर्माण होणाऱ्या आवाजाची डेसिबल पातळी, स्पीकरची रचना आणि क्षमता तपासण्यात आली.
ध्वनिप्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या उपकरणांचीही माहिती घेण्यात आली. गणेशोत्सवात मोठ्या आवाजातील डीजे आणि साऊंड सिस्टिममुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांकडून ध्वनिपातळीवर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपकरणांमुळे आवाजाची पातळी वाढते, याचाही अभ्यास या चाचणीत करण्यात आला. दरम्यान, या विषयावर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवताना मंडळे, साऊंड व्यावसायिक आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टिमच्या वापराबाबत पुणे पोलिसांकडून अधिक काटेकोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु