
मुंबई, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवणारे ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे नवे भक्तिगीत 'सप्तसूर म्युझिक'च्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. श्री मंगेशाच्या चरणी लीन होणाऱ्या भक्ताच्या भावविश्वाचे दर्शन घडवणारे हे गाणं श्रावण विशेष म्हणून रसिकांच्या भेटीला आले आहे.
“सर्व सुखांची प्रचिती घडली, घडला साक्षात्कार...उभी तुझ्या गाभारी मंगेशा, हरपून देहभान”
या भावपूर्ण शब्दांतून श्री मंगेशाच्या सान्निध्यात भक्ताला मिळणारे समाधान, आध्यात्मिक अनुभूती आणि भक्तिभाव अत्यंत सुंदर पद्धतीने व्यक्त झाला आहे.
या गाण्याची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी केली असून, साई दळवी यांनी गीतलेखन केले आहे. गाण्याला प्रणव हरिदास यांनी संगीत दिले असून संगीत संयोजनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने हे गाणं सजलं आहे. त्यांच्या आवाजातील भक्तिभाव आणि स्वरांची ताकद ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ गाण्याला अधिक प्रभावी बनवते.
ताल संयोजन आणि रिदम प्रोग्रामिंग सौरभ शिर्के यांनी केले आहे. बासरी वादन प्रणव हरिदास यांचे असून, व्हायोलिन सेक्शनमध्ये नेविल फ्रँको आणि समूह यांचा सहभाग आहे. तसेच अभिजीत मझुमदार, प्रिन्स दविड आणि धर्मेंद्र जावडा यांनी व्हायोलिनची साथ दिली आहे. व्हियोला वादन जितेंद्र जावडा आणि संदीप ठाकूर यांनी केले आहे. गाण्याच्या कोरससाठी निधी रानडे, शार्दुल कवठेकर आणि कार्तिक लेले यांचा सहभाग आहे. ध्वनी मिश्रण आणि ध्वनी मुद्रणाची जबाबदारी अवधुत वाडकर (Ajivasan Sounds) यांनी सांभाळली असून क्यू व्हॉइस – शार्दुल कवठेकर आहेत.
संगीताच्या विविध प्रकारांना आणि नव्या प्रयोगांना व्यासपीठ देणारे, साईनाथ राजाध्यक्ष यांचे 'सप्तसूर म्युझिक' आपल्या प्रेक्षकांसाठी सातत्याने वेगवेगळ्या धाटणीची गाणी घेऊन येत आहे. प्रेमगीतांपासून भक्तिगीतांपर्यंत, पारंपरिक संगीतापासून आधुनिक संगीतप्रयोगांपर्यंत विविध रंगांची गाणी रसिकांना देण्याचा 'सप्तसूर म्युझिक'चा प्रयत्न राहिला आहे.
याच संगीतप्रवासात श्रावण महिन्याच्या निमित्ताने सप्तसुर म्युझिक चॅनलने पंडित जयतीर्थ मेवुंडी जे भारतरत्न भिमसेन जोशी यांचे शिष्य आहेत त्यांचे उठ आता मंगेशा हे भैरवी आणि भुप रागाचा प्रभाव असलेला अभंग सादर केलेला आहे.आता श्री मंगेशाच्या चरणी अर्पण केलेले ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे भक्तिगीत एक सुंदर भर ठरले आहे. वैशाली सामंत यांच्या स्वरांची जादू, भावपूर्ण शब्द आणि गुणी कलाकारांची सुरेल साथ यामुळे ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे गाणं रसिकांसाठी श्रावणातील एक अविस्मरणीय संगीतानुभव ठरण्याची अपेक्षा आहे.
‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’ हे भक्तिगीत 'सप्तसूर म्युझिक'च्या युट्युब चॅनेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात श्री मंगेशाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होण्यासाठी हे गाणं नक्की ऐका.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर