‘काटवल’च्या चवीला महागाईची किनार
वर्धा, 22 ऑगस्ट (हिं.स.) | पावसाळा सुरू होताच बाजारात दिसणारी आणि खवय्यांचे लक्ष वेधून घेणारी पारंपरिक रान भाजी ‘काटवल’ यंदा महागाईमुळे चर्चेत आली आहे. कमी पावसामुळे जंगलातील काटवलचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्य
‘काटवल’च्या चवीला महागाईची किनार


वर्धा, 22 ऑगस्ट (हिं.स.) | पावसाळा सुरू होताच बाजारात दिसणारी आणि खवय्यांचे लक्ष वेधून घेणारी पारंपरिक रान भाजी ‘काटवल’ यंदा महागाईमुळे चर्चेत आली आहे. कमी पावसामुळे जंगलातील काटवलचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या सेलू बाजारपेठेत काटवलला तब्बल ४०० रुपये किलो या दराने विक्री होत असून, चव जपण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम काटवलच्या उत्पादनावर झाला आहे.

जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणारी ही भाजी मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने बाजारात तिचा पुरवठा कमी झाला आहे. मात्र, काटवलची वैशिष्ट्यपूर्ण चव, पौष्टिक गुणधर्म आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील महत्त्व यामुळे ग्राहकांची मागणी कायम आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी काटवल हा पावसाळ्यातील अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत ठरतो. काटेरी वेलीमधून जीवाची पर्वा न करता काटवल गोळा करून ते बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी ग्रामस्थांना मोठी मेहनत घ्यावी लागते. धोकादायक आणि कष्टाचे काम असले तरी त्यातून मिळणारे उत्पन्न ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार देते.

दरम्यान, बाजारात आवक कमी आणि ग्राहकांची मागणी कायम असल्याने काटवलच्या दरात वाढ झाली आहे. उपलब्धता कमी असतानाही चवीसाठी ग्राहक अधिक पैसे मोजण्यास तयार असल्याने विक्री वेगाने होत आहे. पावसाची परिस्थिती सुधारली नाही, तर हंगाम संपेपर्यंत काटवलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पारंपरिक जंगली भाज्यांची चव जपणाऱ्या ग्राहकांकडून काटवलला आजही मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे यंदा काटवलच्या वाढलेल्या किमतीकडे ग्राहकांचे विशेष लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande