
लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
: नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-२’ अंतर्गत १ ते २१ ऑगस्टदरम्यान पोलिसांनी धडक कारवाई केली. या तीन आठवड्यांत १,२३३ गुन्हे दाखल करून १,९६२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, तब्बल ११ कोटी २४ लाख ८९ हजार ७२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत गुटखा व्यावसायिकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत २९ गुन्हे, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये २७० गुन्हे, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ७४० गुन्हे, शस्त्र अधिनियमांतर्गत ४० गुन्हे, तर इतर कायद्यांनुसार १५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील विविध पोलीस घटकांनी ही कारवाई केली. गुटख्याच्या कारवाईत ६७ लाख ९ हजार ६३७ रुपये, मटका-जुगार प्रकरणांत १ कोटी ७० लाख २७ हजार ६१६ रुपये, दारूबंदी कायद्यांतर्गत ४९ लाख ५८ हजार ८२६ रुपये, शस्त्र अधिनियमांतर्गत २९ लाख ६८ हजार ८५० रुपये, तर इतर कारवायांमध्ये ८ कोटी ८ लाख २४ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध व्यवसायांविरोधातील ही विशेष मोहीम पुढील आठवड्यात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अवैध व्यवसायाची माहिती थेट पोलिसांना द्या
अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांना थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्राच्या वतीने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध दारू, गुटखा, जुगार, मटका किंवा इतर अवैध व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या क्रमांकावर फोन करून किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis