
लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
परदेश अभ्यास दौऱ्याची लातूरमध्ये २७ ऑगस्टला सोडत; ५ शेतकऱ्यांची होणार निवड
लातूरच्या शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेतीचा अभ्यास करण्याची संधी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त झालेल्या पात्र प्रस्तावांची सोडत २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांच्या दालनात काढण्यात येणार आहे. प्रस्ताव सादर केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत देशांमधील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया, निर्यात, पणन, बाजारपेठेतील मागणी तसेच अद्ययावत शेती पद्धतींची माहिती मिळावी, यासाठी कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
परदेशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, विविध क्षेत्रीय भेटी देणे तसेच संबंधित कृषी संस्था व उपक्रमांची माहिती घेणे, या माध्यमातून शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढविणे हा या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
लातूर जिल्ह्यासाठी ५ शेतकऱ्यांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये एक महिला शेतकरी, केंद्र व राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धेतील विजेते तसेच इतर पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली आहे. यासाठी तालुकास्तरावरून इच्छुक शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून पात्र प्रस्तावांची सोडत काढून निवड करण्यात येणार आहे.
प्रस्ताव सादर केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांच्या दालनात उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis