अमरावती विभागात 93 टक्के खरिपाची पेरणी पूर्ण
विभागात सोयाबीन,कपाशीलाच सर्वाधिक पसंती अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम विदर्भातील अमरावती महसूल विभागात चालू २०२६ च्या खरीप हंगामात आतापर्यंत सरासरीच्या ९३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. विभागातील ३१ लाख ६० हजार ८८४ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी २९
अमरावती विभागात 93 टक्के खरिपाची पेरणी पूर्ण


विभागात सोयाबीन,कपाशीलाच सर्वाधिक पसंती

अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम विदर्भातील अमरावती महसूल विभागात चालू २०२६ च्या खरीप हंगामात आतापर्यंत सरासरीच्या ९३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. विभागातील ३१ लाख ६० हजार ८८४ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी २९ लाख ५४ हजार ७३९ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. यंदाही शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीन आणि कपाशीलाच पहिली पसंती दिली असून, पारंपरिक तृणधान्ये व कडधान्यांच्या क्षेत्रात मात्र मोठी घट नोंदवली गेली आहे.

कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये पेरणीची सरासरी ९० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात ९७ टक्के (७ लाख १३ हजार ८१८ हेक्टर), अकोला ९१ टक्के (३ लाख ९४ हजार ९२९ हेक्टर), वाशीम ९३ टक्के (३ लाख ६९ हजार ८५६ हेक्टर), अमरावती ९३ टक्के (६ लाख ३८ हजार ३८१ हेक्टर) आणि यवतमाळ जिल्ह्यात ९२ टक्के (८ लाख ३७ हजार ७५४ हेक्टर) पेरणी पूर्ण झाली आहे.

विभागाच्या एकूण पेरणी क्षेत्रात सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्यपिकांचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. विदर्भात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १४ लाख ६३ हजार ४११ हेक्टर असून, त्यापैकी १३ लाख ४७ हजार ००४ हेक्टरवर (९२ टक्के) प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख ४४ हजार ४०१ हेक्टर (११२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ वाशिममध्ये २ लाख ७१ हजार ०५० हेक्टर (९१ टक्के), यवतमाळमध्ये २ लाख ४२ हजार २६८ हेक्टर (८६ टक्के), अमरावतीत २ लाख ०६ हजार ७२६ हेक्टर (८३ टक्के) आणि अकोल्यात १ लाख ८१ हजा ९९८ हेक्टरवर (७७ टक्के सोयाबीनचा पेरा झाला आहे.

विभागात कापसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९२ हजार ६१० हेक्टर असतान प्रत्यक्षात १० लाख ८२ हजार ९१ हेक्टरवर (९९ टक्के) लागवड झाव आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असून, तिथे ४ लाख ८७ हजार ५११ हेक्टरवर (१०३ टक्के) लागवड झाली आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ६८ हजार २९६ हेक्टर (१०० टक्के), अकोल्यात १ लाख ५५ हजार ०८७हेक्टर (१२१ टक्के), बुलढाण्यात १ लाख ३४ हजार १०२ हेक्टर (६८ टक्के) आणि वाशिममध्ये ३७ हजार ६५२ हेक्टरवर (१४२ टक्के) कापूस लागवड झाली आहे.

४,३१,३४५ हेक्टरवर तूर पेरणीडाळवर्गीय पिकांमध्ये तुरीची पेरणी विभागात ४ लाख ३१ हजार ३४५ हेक्टरवर (९६ टक्के) झाली आहे. मात्र मुगाची पेरणी केवळ १६ टक्के (५ हजार ७७१ हेक्टर) आणि उडदाची पेरणी २० टक्के (६ हजार ३७० हेक्टर) क्षेत्रावरच आटोपली आहे. मजुरांची टंचाई, वन्यप्राण्यांचा उपद्रव, बदलते हवामान आणि हमीभावाची अनिश्चितता या कारणांमुळे शेतकरी तृणधान्य व इतर कडधान्यांऐवजी सोयाबीन-कपाशीकडे वळत असल्याचे चित्र या अहवालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande