
पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि काँग्रेसप्रणीत एनएसयूआयशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि अभाविपवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी अभाविपच्या तक्रारीवरून सात जणांसह सुमारे 50 ते 60 एनएसयूआय आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या आधीच विद्यार्थ्यांमध्ये राजकीय मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. सीओईपीच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीच्या व्हिडिओ स्टेटसवरून अभाविपशी संबंधित विद्यार्थी आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक अस्वस्थ झाल्याचा दावा केला. कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी काही लोकांना पाठवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
“विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही म्हणून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारला जात आहे,” अशी टीका सपकाळ यांनी केली. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस सहन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलिसांच्या नोंदीनुसार 21 ऑगस्ट रोजी रात्री सीओईपी वसतिगृह परिसरात हा प्रकार घडला. अभाविपशी संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील विद्यार्थी राजकारणासह काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु