प्रियकरा सोबत लग्न करण्यासाठी स्मशानात अघोरी कृत्य, दोघाना अटक
Atrocious act in graveyard to marry lover, two arrested
प्रियकरा सोबत लग्न करण्यासाठी स्मशानात अघोरी कृत्य, दोघाना अटक


प्रियकरासोबत विवाह जमवून देण्याचे आमिष अघोरी पूजेच्या नावाखाली महिलेची ७७ हजारांची फसवणूक

नाशिक, २२ ऑगस्ट (हिं.स.) : प्रियकरासोबत विवाह जमवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एका भोंदू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करून पीडित महिलेकडून ७७ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील बलसाड येथील ही महिला आपल्या प्रियकरासोबत नाशिकमध्ये आली होती. संबंधित महिलेचे जितू पवार याच्यासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तिने सांगितले. मात्र, प्रियकराने विवाहास नकार दिल्यानंतर तिची एका भोंदूशी ओळख झाली.

विशाल रामदास खडांगळे या भोंदूने प्रियकरासोबत महिलेचा विवाह जमवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्यासाठी अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करण्याचे ठरविण्यात आले. या पूजेदरम्यान जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या महिलेच्या अंगावर फेकण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पूजा केल्यानंतरही प्रियकरासोबत विवाह न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने भोंदूकडे पैसे परत मागितले असता त्याने आणि त्याच्या साथीदाराने दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

यानंतर पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून विशाल रामदास खडांगळे आणि त्याचा साथीदार जितू पवार या दोघांना अटक केली.

पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आदींनी प्रयत्न केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande