अमरावतीत भाजपची भव्य दहीहंडी
फडणवीसांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण अमरावती, २२ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने यंदा भव्य ‘गोविंदा आला रे’ दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राणा दाम्पत्याच्या दहीहंडीची भाजपकडून कॉपी , सोशल मीडियावर चर्चेला उधाण


फडणवीसांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण

अमरावती, २२ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने यंदा भव्य ‘गोविंदा आला रे’ दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याचे वृत्त असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या दहीहंडी उत्सवाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अमरावतीत दरवर्षी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. मात्र, यंदा भाजपकडून स्वतंत्रपणे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दहीहंडी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर भाजपच्या दहीहंडी आयोजनाची तुलना राणा दाम्पत्याच्या दहीहंडीशी करणाऱ्या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. ‘राणा दाम्पत्याच्या दहीहंडीची भाजप कॉपी करणार का?’ असा सवाल या पोस्टमधून उपस्थित करण्यात आला आहे.

याच पोस्टमध्ये उपरोधिकपणे ‘यंदा भाजपकडून राखीला साड्या आणि दिवाळीत किराणा किंवा इतर वस्तूंचे वाटप होणार का?’ असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील या चर्चेला राजकीय रंग चढला आहे.

भाजपने यंदा स्वतंत्रपणे दहीहंडीचे आयोजन केल्याने हा उत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता अमरावतीतील राजकीय चर्चेचाही केंद्रबिंदू ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाव्य उपस्थिती आणि राणा दाम्पत्याच्या दहीहंडीशी होत असलेली तुलना यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande