बीएमडब्ल्यू इंडियाने भारतात बीएमडब्ल्यू एक्स१ एलडब्ल्यूबी केली लॉन्च
मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू इंडियाने भारतीय बाजारात आपली नवीन बीएमडब्ल्यू एक्स१ एलडब्ल्यूबी ही लाँग व्हीलबेस एसयूव्ही दाखल केली आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४०.९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
BMW India Launches BMW X1 LWB


BMW India Launches BMW X1 LWB


मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू इंडियाने भारतीय बाजारात आपली नवीन बीएमडब्ल्यू एक्स१ एलडब्ल्यूबी ही लाँग व्हीलबेस एसयूव्ही दाखल केली आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४०.९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही किंमत आधीच्या एक्स१ पेट्रोल मॉडेलपेक्षा सुमारे एक लाख रुपयांनी कमी आहे. एक्स१ एलडब्ल्यूबी सध्या केवळ पेट्रोल इंजिन पर्यायासह उपलब्ध करण्यात आली असून, आधीच्या मॉडेलच्या तुलनेत तिच्या इंजिनची ताकदही वाढवण्यात आली आहे.

डिझाइनच्या बाबतीत बीएमडब्ल्यू एक्स१ एलडब्ल्यूबी आणि स्टँडर्ड एक्स१मध्ये फार मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, आकारमानात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. नवीन एलडब्ल्यूबी मॉडेलची एकूण लांबी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा ११६ मिलीमीटरने अधिक असून, तिचा व्हीलबेस १०८ मिलीमीटरने वाढवण्यात आला आहे. याशिवाय, बाजूच्या आणि मागील भागात नवीन सॅटिन ट्रिम इन्सर्ट्स देण्यात आले आहेत.

आतील भागात समोरील केबिनमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये एसिमेट्रिक डॅशबोर्ड आणि कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले एकत्रित करण्यात आले आहेत. मागील आसनांमध्ये मात्र प्रवाशांच्या आरामावर विशेष भर देण्यात आला असून, लेगरूममध्ये तब्बल १०९ मिलीमीटरची वाढ करण्यात आली आहे. मागील सीटच्या रचनेतही आरामदायी प्रवासासाठी बदल करण्यात आले आहेत.

फीचर्सच्या बाबतीत एक्स१ एलडब्ल्यूबीमध्ये वायरलेस स्मार्टफोन इंटिग्रेशन, वायरलेस चार्जिंग पॅड, रिअर एसी व्हेंट्ससह ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, ड्राइव्ह मोड्स, पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, हरमन कार्डन साउंड सिस्टीम, ३६०-डिग्री कॅमेरा आणि रिव्हर्स असिस्टंट यांसारखी सुविधा मिळते.सुरक्षेच्या दृष्टीने या एसयूव्हीमध्ये एडीएएस म्हणजेच अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम देण्यात आली आहे. यात फ्रंट कोलिजन वॉर्निंग, रिअर क्रॉस-ट्रॅफिक वॉर्निंग, ब्रेक इंटरव्हेन्शन, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीपिंग असिस्ट आणि ब्रेकिंगसह डायनॅमिक क्रूझ कंट्रोलचा समावेश आहे.

पॉवरट्रेनमध्ये १.५-लिटर, तीन-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, या इंजिनची ताकद वाढवण्यात आली असून ते आता १५४ बीएचपी पॉवर आणि २३० एनएम टॉर्क निर्माण करते. आधीच्या तुलनेत पॉवरमध्ये २० बीएचपीची वाढ झाली आहे. हे इंजिन सात-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आले असून, त्याची पॉवर पुढील चाकांना दिली जाते. त्यामुळे अधिक जागा, दमदार कामगिरी आणि आधुनिक सुरक्षाव्यवस्थेसह बीएमडब्ल्यू एक्स१ एलडब्ल्यूबी भारतीय ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande