
अमरावती, २२ ऑगस्ट (हिं.स.) : भूतकाळातील मुद्दे उकरून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
“शिळी भाकरी सकाळी खात नसतात. ज्या वेळी निर्णय घ्यायचा होता, त्यावेळी तुमचे हात लुळे-पांगळे होते का?” असा सवालही बावनकुळे यांनी विरोधकांना केला. तथ्य नसलेल्या मुद्द्यांना हवा देऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
मेळघाटातील आश्रमशाळेतील अफवेवर स्पष्टीकरण
मेळघाटातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्यांमध्ये भूतबाधेची अफवा पसरल्याच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, आदिवासी विभागाकडून परिस्थितीवर काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भूतबाधेवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही अफवा नेमकी कोणी पसरवली, याचाही तपास करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
महर्षी पब्लिक स्कूल प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल
अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलमधील विषबाधा प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. आदिवासी विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शाळेवर कोणती कारवाई करता येईल याबाबत पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळेचा परवाना रद्द करण्यापासून नियमानुसार इतर कठोर कारवाईपर्यंतच्या पर्यायांवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
साखरेच्या दरावरही सरकारचे लक्ष
साखरेच्या वाढत्या दराबाबत बोलताना बावनकुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकार दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जनतेशी संबंधित प्रश्नांवर सरकार आवश्यक ती पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “तथ्य नसलेल्या मुद्द्यांना हवा देऊन जनतेत संभ्रम निर्माण करू नका,” असा इशाराही बावनकुळे यांनी विरोधकांना दिला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी