राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर
रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । राज्य शासनातर्फे राज्य स्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टे
राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर


रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । राज्य शासनातर्फे राज्य स्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली किंवा स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रीतसर परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत पात्र असतील. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshostav.pidmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

मंडळांची निवड ५ प्रमुख निकषांवर केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येकी २० गुणांचा समावेश आहे : कलांचे जतन व संवर्धन (२० गुण), संस्कृतीचे जतन व संवर्धन (२० गुण), निसर्ग आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण व संवर्धन (२० गुण), सामाजिक कार्य (२० गुण), गणेशोत्सव आयोजनातील विधायकता व शिस्त (२० गुण).

जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली तालुकास्तरीय समित्या प्रत्यक्ष गणेशोत्सवादरम्यान मंडळांना भेटी देतील. मूल्यमापनासाठी मंडळांच्या सन २०२५ च्या अनंत चतुर्दशीपासून ते सन २०२६ च्या अनंत चतुर्दशीपर्यंतच्या वर्षभरातील कार्याचा विचार केला जाईल. भेटीदरम्यान मंडळांनी कामाचे फोटो, अहवाल व व्हिडिओग्राफी सादर करणे अनिवार्य आहे.

स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसांचा तपशील असा - तालुका स्तर प्रथम क्रमांक २५,००० रोख व प्रमाणपत्र. जिल्हास्तर : प्रथम : ५०,०००, द्वितीय ४०,०००, तृतीय : ३०,००० रुपये.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या विधायक उपक्रमांची नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande