
अमरावती, २२ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यात अवैध सावकारी आणि बेकायदेशीर व्याजवसुलीविरोधात सहकार विभागाने धाडसत्र सुरू केले असून, सलग तीन दिवसांत अमरावती, तिवसा, बडनेरा, चांदूर बाजार, मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील ११ ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईत आतापर्यंत ११४ संशयास्पद दस्तऐवज जप्त करून चौकशीसाठी सील करण्यात आले आहेत.
जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकांनी ही कारवाई केली. शुक्रवारी अमरावती शहर, चांदूर बाजार आणि मोर्शी येथे सहा ठिकाणी रात्री उशिरापर्यंत झडती घेण्यात आली.
अमरावतीत ३२ संशयास्पद दस्तऐवज जप्त
अमरावतीतील कठोरा रोडवरील देवी रेसिडेन्सीमधील दोन फ्लॅटमध्ये नवनीत रतनलाल चांडक यांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली. यावेळी ३२ संशयास्पद दस्तऐवज आढळले. याच प्रकरणात गौरीनंदन प्रोव्हीजन्स या दुकानातून नाव नसलेला कोरा धनादेशही जप्त करण्यात आला.
चांदूर बाजार येथील राजेश चांडक यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता संशयास्पद कागदपत्रे आढळली नाहीत. मात्र, जयस्तंभ चौकातील आनंद ट्रेडर्स येथे कमलकिशोर सारडा यांच्या ठिकाणी नऊ कोरे स्टॅम्पपेपर आढळले.
कैलास कमलकिशोर सारडा यांच्या हनुमान चौकातील निवासस्थानी झडती घेऊन नऊ दस्तऐवज जप्त करण्यात आले. यामध्ये स्थावर मालमत्तेचे खरेदीखत, नोंदवहीसह विविध कागदपत्रांचा समावेश आहे.
मोर्शीतील घनश्याम गट्टाणी यांच्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली; मात्र तेथे संशयास्पद कागदपत्रे आढळली नाहीत.
बडनेरा, तिवसा येथेही मोठी कारवाई
यापूर्वी गुरुवारी बडनेरा परिसरातील चार ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन ठिकाणांहून ४३ संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले. यात इसारचिठ्ठ्या, कोरे खरेदीखत आणि शेतकऱ्यांचे सातबारा उतारे आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
बुधवारी तिवसा शहरातील शिवाजी चौकात झालेल्या कारवाईत ३९ संशयास्पद दस्तऐवज, कोरे धनादेश, स्वाक्षरी केलेले कोरे कागद, मुद्रांकित कोरे कागद, दोन दुचाकी आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र जप्त करण्यात आले.
या तीन दिवसांच्या कारवाईत सहकार विभागाचे ४४ अधिकारी-कर्मचारी, २२ पोलिस कर्मचारी आणि २२ पंच सहभागी झाले. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे.
या कागदपत्रांच्या तपासातून अवैध सावकारीचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सहकार विभागाच्या कारवाईचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी