देगलूर अंध विद्यालयातील विद्यार्थिनीच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरीची मागणी नांदेड, २२ ऑगस्ट (हिं.स.) : देगलूर येथील अंध विद्यालयातील १७ वर्षीय दिव्यांग विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवा
अ


पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरीची मागणी

नांदेड, २२ ऑगस्ट (हिं.स.) : देगलूर येथील अंध विद्यालयातील १७ वर्षीय दिव्यांग विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन, नांदेडच्या वतीने शासन-प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासोबतच पात्र कुटुंबीयास शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दिव्यांग विद्यालयांची विशेष तपासणीची मागणी

नांदेड जिल्ह्यातील अंध, मूकबधिर, बौद्धिक दिव्यांग, अस्थिव्यंग तसेच इतर सर्व प्रवर्गांतील दिव्यांग विद्यालयांची तातडीने विशेष तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या तपासणीदरम्यान शिक्षक व कर्मचाऱ्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर यांसह विविध बाबींची चौकशी करावी. तसेच विद्यार्थी आणि पालकांशी स्वतंत्रपणे संवाद साधून विद्यालयांमधील वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मार्च २०२५ पासून पाठपुरावा

या प्रश्नासाठी मार्च २०२५ पासून बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासाठी निवेदने, आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande