
रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । ग्राहकांचा विश्वास संपादन केला, तर विकास आपोआपच होईल, असे प्रतिपादन उद्योजक मल्हार मलुष्टे यांनी केले.
अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी श्री. शंकर ढोले स्टुडंट्स एनरिचमेंट सेल उपक्रमांतर्गत उद्योजक मल्हार मलुष्टे यांची मुलाखत आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते. कचरा व्यवस्थापन या विषयावर त्यांनी माहिती दिली. ते पॉलिमर इंजिनियर आणि प्लास्टिकपासून कच्चा माल तयार करतात.
त्यांनी अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय ते उद्योजकतेपर्यंतचा आपला प्रवास प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वानंदी शेंबवणेकर, अदिती फडके, हिमांक खातू आणि स्वराज डोंगरे या विद्यार्थ्यांनी त्यांची मुलाखत अतिशय प्रभावीपणे घेतली. व्यवसाय सुरू करण्यापासून ते आत्तापर्यंत आलेले विविध प्रकारचे चांगले-वाईट अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. तरुण पिढीने नोकरी शोधणारे न होता नोकरी निर्माण करणारे व्हावे, त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य कशा प्रकारे आवश्यक आहे हे श्री. मलुष्टे यांनी अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली माणसे कमवा की जी तुम्हाला व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी पडतील, असे आवाहन केले. यावेळी मल्हार मलुष्टे आणि सौ. मलुष्टे यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
वाणिज्य शाखाप्रमुख सौ. शिल्पा तारगावकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला प्रा. भूषण केळकर, प्रा. प्रभात कोकजे उपस्थित होते. कार्यक्रमाला वाणिज्य शाखेतील १२० विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी