सावित्री पुलावरील जॉईंट दुभंगला; वाहनचालक धास्तावले
रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील नवीन पुलाच्या एक्सपांशन जॉईंटला पुन्हा भगदाड पडल्याने पुलाच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांत याच ठिकाणी दुसऱ्यांदा जॉईंट खरा
सावित्री पुलावरील जॉईंट दुभंगला; वाहनचालक धास्तावले


रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील नवीन पुलाच्या एक्सपांशन जॉईंटला पुन्हा भगदाड पडल्याने पुलाच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांत याच ठिकाणी दुसऱ्यांदा जॉईंट खराब झाल्याने दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जॉईंटमधून लोखंडी भाग बाहेर आल्याने वाहनचालकांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा भाग धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने संबंधित ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

सावित्री नदीवरील जुन्या पुलाच्या दुर्घटनेनंतर याच परिसरात नवीन पूल उभारण्यात आला. मात्र, नवीन पुलावरील एक्सपांशन जॉईंट वारंवार खराब होत असल्याने पुलाच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावर अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने पुलावरील जॉईंटची नियमित तपासणी आणि देखभाल आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

2 ऑगस्ट 2016 रोजी सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. मुंबईच्या दिशेने जाणारी एसटी बस तसेच काही वाहने नदीत कोसळली होती. या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या पुलाच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

पुलावरील एक्सपांशन जॉईंटची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे. संबंधित विभागाने पुलाची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande