
बीड, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. गहिनीनाथ महादेव पाखरे सर यांच्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवापूर्ती निमित्त आयोजित सन्मान सोहळ्यास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की,एम.एस्सी. गणित विषयातील उच्चशिक्षित असलेल्या पाखरे सरांनी खालापुरी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात तब्बल २२ वर्षे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात एकूण ३२ वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले. शिक्षण क्षेत्रासोबतच समाजकारणातही सक्रिय राहून त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि २०२३ पासून पाडळी गावचे सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे.
शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामविकासाची ही वाटचाल पुढे नेताना पाडळी परिसरातील रस्ते व विविध विकासकामांसाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पाडळी–आर्वी तसेच पाडळी–खालापुरी रस्त्यांच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी माझी भेट घेऊन केलेला पाठपुरावा विशेष उल्लेखनीय आहे.
कुटुंबातही शिक्षण आणि शासकीय सेवेची परंपरा जपणाऱ्या पाखरे सरांचे सुपुत्र अभिजित पाखरे हे यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय महसूल सेवा (आयआरएस) मध्ये कार्यरत आहेत. ही त्यांच्या कुटुंबासाठी तसेच संपूर्ण पाडळी गावासाठी अभिमानाची बाब आहे.
३२ वर्षांची ज्ञानसेवा, सामाजिक बांधिलकी आणि गावाच्या विकासासाठीची तळमळ यांचा सुंदर संगम म्हणजे गहिनीनाथ पाखरे सरांची कारकीर्द. त्यांच्या या निष्ठापूर्वक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis