घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैध रिफिलिंगचा पर्दाफाश; १३ सिलेंडरसह मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। घरगुती वापरासाठी वितरित होणाऱ्या एलपीजी सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार खुलताबाद शहरातील जुने बसस्थानक परिसरात उघडकीस आला. सहायक पोलीस अधीक्षक, कन
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। घरगुती वापरासाठी वितरित होणाऱ्या एलपीजी सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार खुलताबाद शहरातील जुने बसस्थानक परिसरात उघडकीस आला. सहायक पोलीस अधीक्षक, कन्नड उपविभाग, अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ घरगुती गॅस सिलेंडर, एक ऑटोरिक्षा, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक वजनकाटा व रिफिलिंगची यंत्रणा असा सुमारे १ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांना जुने बसस्थानक परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड उपविभागीय पोलीस कार्यालय आणि खुलताबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली.

कारवाईदरम्यान घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी गॅस रिफिलिंग करताना आढळून आला. घटनास्थळी घरगुती गॅस सिलेंडरसोबत गॅस हस्तांतरणासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, वजनकाटा आणि अन्य साहित्य आढळले. पोलिसांनी तातडीने संपूर्ण रिफिलिंग यंत्रणा, ऑटोरिक्षा आणि गॅस सिलेंडर ताब्यात घेतले.

या कारवाईत १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त झाल्याने घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेल्या एलपीजीचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे सिलेंडरमधील गॅस वाहनांच्या टाकीत हस्तांतरित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली होती. अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना गळती, आग किंवा स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार केवळ अनधिकृत गॅस विक्रीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचे पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे.

या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, जीवनावश्यक वस्तू व सेवा अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा वापर किती काळापासून आणि किती वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी केला जात होता, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, अंमलदार मयुर वाळुंजकर, अमोल गायकवाड, संदिप जोनवाल, योगिता पाटील तसेच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस हवालदार जाकीर शेख, किशोर गवळी, सिद्धार्थ सदावर्ते, महिला पोलीस हवालदार सोनाली कुंदे, चालक पोलीस हवालदार अनिल जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश क्षिरसागर यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande