सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा डिसेंबरपर्यंत सज्ज करा : प्रकाश आबिटकर
भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी २५४ कोटींचा आराखडा सुमारे साडेतीन हजार मनुष्यबळाचे नियोजन नाशिक, २२ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक
In the backdrop of Kumbh Mela


भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी २५४ कोटींचा आराखडा

सुमारे साडेतीन हजार मनुष्यबळाचे नियोजन

नाशिक, २२ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रभावी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने डिसेंबरपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक नाशिक येथील कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री आबिटकर यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला.

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषधांचा पुरेसा साठा आणि वैद्यकीय मनुष्यबळाचे नियोजन आतापासूनच करावे, असे आबिटकर यांनी सांगितले. काही शासकीय रुग्णालयांची प्रलंबित कामे मोहीम स्तरावर पूर्ण करून ती डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करावीत, तसेच त्यांचे लोकार्पण करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

कुंभमेळ्याच्या कालावधीत रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येणार असून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल. वैद्यकीय क्षेत्रातील संस्था आणि संघटनांचे सहकार्य घेऊन त्यांच्याशी समन्वय साधावा, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

भाविकांनी कुंभमेळ्यात येण्यापूर्वी ‘फ्ल्यू’ प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जळीत रुग्णांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून त्यासाठी आवश्यक उपचारपद्धती निश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवेसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देताना सध्याच्या इमारतीत आवश्यकतेनुसार बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवावा आणि नवीन रुग्णालयासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असे आबिटकर यांनी सांगितले.

२५४ कोटींचा आरोग्य आराखडा

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मिळून सुमारे २५४ कोटी रुपयांचा आरोग्य आराखडा तयार केला आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत सुमारे साडेतीन हजार मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून त्याचे नियोजन सुरू आहे.

नवीन रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात येणार आहे. नदीकाठाच्या दोन्ही बाजूंना, साधुग्राम, वाहनतळ तसेच गर्दीच्या प्रमुख ठिकाणी आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामार्गावरील अपघात आणि त्यावरील आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती सादर केली.

महिला रुग्णालयाचे बांधकाम, विभागीय संदर्भ सेवा

रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा तातडीने सुरू करणे, किडनीविषयक आजारांवरील उपचार सुरू करणे, शीतकक्षाची क्षमता वाढविणे, त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालय सुरू ठेवणे आणि ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करणे, अशा विविध मागण्या लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडल्या.

तसेच औषधांचा साठा वाढविणे, पर्वणी कालावधीनंतरही आरोग्य सेवा कायम ठेवणे आणि शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधा कार्यान्वित करणे, अशी अपेक्षाही खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यक्त केली.

बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande