
परभणी, २२ ऑगस्ट (हिं.स.) : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी विभाग सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. परभणीच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार असून, कर्करोगासह विविध गंभीर आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होणार आहे.
हिस्टोपॅथोलॉजी विभाग हा रोगनिदान प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक मानला जातो. शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आलेल्या पेशी, ऊती, गाठी तसेच बायोप्सीच्या नमुन्यांची सूक्ष्म तपासणी या विभागामार्फत केली जाते. या तपासणीद्वारे कर्करोगाचे स्वरूप, प्रकार आणि ग्रेड निश्चित करण्यास मदत होते. तसेच रुग्णाच्या पुढील उपचाराची योग्य दिशा ठरविण्यासाठी या अहवालाचा उपयोग होतो.
आर.पी. हॉस्पिटलमधील सर्जरी, स्त्रीरोग, युरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, त्वचारोग यांसह विविध विभागांतून दररोज बायोप्सी आणि शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आलेले ऊतींचे नमुने तपासणीसाठी येतात. आता रुग्णालयातच अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी सुविधा उपलब्ध झाल्याने निदान प्रक्रियेत होणारा विलंब कमी होण्यास मदत होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांना वेळेत अचूक अहवाल उपलब्ध झाल्याने रुग्णाच्या पुढील उपचाराची दिशा तातडीने निश्चित करणे शक्य होणार आहे.
या सुविधेमुळे कर्करोग, विविध प्रकारच्या गाठी आणि इतर गंभीर आजारांचे अचूक व जलद निदान परभणीतच होणार आहे. त्यामुळे पुढील तपासणी किंवा उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होऊन रुग्णांचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याचा विश्वास आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केला.
उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, प्राध्यापक डॉ. सुशील दोडके, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. पल्लवी दोडके, डॉ. सनोबर खान, डॉ. विजय शेळके, डॉ. कृष्णप्रिया यांच्यासह संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गुणवंत अहिरे आणि विभागीय अधिकारी विशाल आहेर उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis