नवनीत राणांच्या नाराजीच्या चर्चेवर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.)। भाजप नेत्या तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या पक्षात नाराज आहेत का, अशी चर्चा सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान नवनीत राणा कुठ
नवनीत राणा भाजपात नाराज? बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण; ‘राणांचं पूर्ण जीवन भाजपसाठी असणार’


अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.)। भाजप नेत्या तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या पक्षात नाराज आहेत का, अशी चर्चा सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान नवनीत राणा कुठेही दिसून न आल्याने या चर्चांना आणखी उधाण आले. दरम्यान, नवनीत राणा यांच्या नाराजीच्या चर्चांवर पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत त्या पक्षात नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच बावनकुळे अमरावती शहराच्या दौऱ्यावर असताना राणा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना बळ मिळाले. दुसरीकडे, नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका सूचक शायरीच्या व्हिडीओचीही राजकीय वर्तुळात चर्चा झाली. या व्हिडीओच्या माध्यमातून त्या नेमका कुणावर निशाणा साधत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात होता.

या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांना नवनीत राणा यांच्या कथित नाराजीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी नवनीत राणा कोणत्याही प्रकारे नाराज नसल्याचे सांगितले. त्या भाजपच्या विचारांशी आणि पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. तसेच राणांचे पूर्ण जीवन भाजपसाठी असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बावनकुळे यांच्या या स्पष्टीकरणानंतरही अमरावतीच्या राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राणा यांच्या अनुपस्थितीमागे नेमके कारण काय, पक्षांतर्गत राजकारणाचा त्याला संदर्भ आहे का, की त्यांच्या अनुपस्थितीचा राजकीय अर्थ काढला जात आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत.

दरम्यान, आगामी काळात नवनीत राणा आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांतील सहभाग आणि राजकीय समन्वय कसा राहतो, यावरून या चर्चांचे वास्तव कितपत आहे, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या मात्र बावनकुळे यांनी राणांच्या नाराजीच्या चर्चांना ठामपणे नकार देत त्या भाजपसोबत एकनिष्ठ असल्याचे सांगितले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande