कापड कचऱ्यापासून रोजगारनिर्मिती; गिरिराज सिंह यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन
रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। : कापड कचऱ्याच्या पुनर्वापराला चालना देण्याच्या उद्देशाने देशातील पहिल्या कापड पुनर्वापर केंद्राचे बेलापूर येथे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले
Job creation from textile waste; Centre inaugurated by Giriraj Singh


रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। : कापड कचऱ्याच्या पुनर्वापराला चालना देण्याच्या उद्देशाने देशातील पहिल्या कापड पुनर्वापर केंद्राचे बेलापूर येथे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे कापड कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबरोबरच महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे कापड कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वापरात नसलेले कपडे आणि कापड थेट कचऱ्यात टाकले जात असल्याने त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कापडाचे संकलन, वर्गीकरण, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्यासाठी बेलापूरमध्ये सुरू करण्यात आलेले हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.

या केंद्रात जुन्या तसेच वापरात नसलेल्या कपड्यांचे संकलन करून त्यांचे विविध प्रकारांनुसार वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानंतर त्यावर आवश्यक प्रक्रिया करून पुनर्वापर करता येणारे साहित्य तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे कापड कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास आणि पर्यावरण संवर्धनास मदत होण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. कापड संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापराशी संबंधित कामांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळणार आहे.

कापड पुनर्वापराच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि रोजगारनिर्मिती या तीनही बाबी साध्य करण्याचा प्रयत्न या केंद्रातून करण्यात आला आहे. बेलापूरमध्ये सुरू झालेला हा उपक्रम देशातील इतर शहरांसाठीही दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande