
रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । लांज्यातील कुंभारवाडी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चिखल नांगरणी स्पर्धेत गावठी आणि घाटी अशा दोन गटांत विविध भागांतील बैलजोड्यांनी सहभाग घेतला.
चिखलाच्या शेतात नांगरणीचे कौशल्य आणि बैलजोड्यांची कामगिरी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गावठी गटात स्वराज गुरव (आरवली, ता. संगमेश्वर) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या बैलांची नावे शिव व शत्रू असून चालक मुन्ना गुरव होते. स्वप्नील राहाटे (पाथर्डी, ता. चिपळूण) यांनी द्वितीय, तर विनायक प्रकाश रामाणे (व्हेळ, ता. लांजा) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
घाटी गटात संजय वामन सावंत (पाली-बांबर, ता. लांजा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या बैलांची नावे पाखऱ्या व लाडक्या असून चालक रामू होते. सुनील भितळे (विवली, ता. लांजा) यांनी द्वितीय, तर आई जुगाई प्रसन्न (व्हेळ, ता. लांजा) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेदरम्यान चण्या या बैलानेही उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक शेती संस्कृती आणि बैलजोडीच्या परंपरेला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुंभारवाडी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी