रत्नागिरी : भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाविषयी व्याख्यान
रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । येथील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन व संस्थात्मक सुरक्षा उपाययोजना या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूप एस. काळे यांनी हे व्याख
रत्नागिरी : भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाविषयी व्याख्यान


रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । येथील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन व संस्थात्मक सुरक्षा उपाययोजना या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूप एस. काळे यांनी हे व्याख्यान दिले. त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यानात भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, त्यांच्यापासून उद्भवणारे संभाव्य धोके, प्रामुख्याने माणसांवरील हल्ले व त्यामुळे उद्भवणारा रेबिज रोग आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. संस्थेच्या परिसरातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली. व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना डॉ. काळे यांनी उत्तरे दिली व शंकासमाधान केले.

राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विथ सायबर सिक्युरिटी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या व्याख्यानाला प्रा. उमेश सामंत (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक), प्रा. आरती मुळ्ये (राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम समन्वयक) व प्रा. हर्षा केळकर (विभाग सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना ) हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग सायबर सिक्युरिटी विभाग प्रमुख डॉ. गीतांजली सावंत व प्रा. अश्विनी काळे यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande