
वर्धा, २२ ऑगस्ट (हिं.स.) : हिंगणघाट शहराच्या विकासाला गती देतानाच शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या तीन भव्य प्रवेशद्वारांचे तसेच आकर्षक विद्युत रोषणाईच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
शहरात येणाऱ्या नागरिकांचे तसेच पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारी ही भव्य प्रवेशद्वारे आता हिंगणघाटची नवी ओळख ठरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील सप्तरंगी भव्य प्रवेशद्वार, तहसील कार्यालयासमोरील प्रवेशद्वार आणि गोकुळधाम मैदानासमोरील भव्य प्रवेशद्वार अशा तीन ठिकाणी ही प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे.
यासोबतच शिवाजी महाराज उद्यानासमोरील परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, प्रताप आणि शौर्यगाथा सांगणारे आकर्षक म्युरल उभारण्यात आले आहे. हे म्युरल नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी हिंगणघाटचे रूप अधिक देखणे आणि आकर्षक दिसणार आहे.
आमदारांच्या मार्गदर्शनाखाली साकारले डिझाइन
या भव्य प्रवेशद्वारांचे आणि शहर सुशोभीकरणाचे डिझाइन आमदार समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत धमाने आणि वास्तुविशारद रुपाली मिटकर यांनी या कामाची रचना केली आहे.
या नव्या सुशोभीकरणामुळे हिंगणघाट शहराच्या विकासाची आणि बदलत्या स्वरूपाची नवी झलक नागरिकांना पाहायला मिळत आहे. भव्य प्रवेशद्वारे, ऐतिहासिक म्युरल आणि आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली असून हिंगणघाटला एक नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर, नगरपरिषद उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष गिरधर राठी, तसेच किशोर दिघे, आकाश पोहाणे, उमेश तुळसकर, संजय डेहणे, अंकुश ठाकूर, चंद्रकांत मावळे, संजय माडे, दिनेश वर्मा, शीतल मोहता, किरण वैद्य, पल्लवी बाराहाते, कौशर अंजूम, कीर्ती सांयकार, अनिता मावळे, राजाभाऊ मॅडमवार, श्याम भिमनवार, शाकीर पठाण, भुषण पिसे, विनोद विटाळे आणि वामण चंदनखेडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी