
मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। पोको कंपनीने आपल्या एम८ मालिकेतील तिसरा स्मार्टफोन म्हणून ‘पोको एम८एक्स ५जी’ भारतात लाँच केला. हा फोन यापूर्वी भारतात दाखल झालेल्या ‘पोको एम८ ५जी’ आणि ‘पोको एम८ पॉवर’च्या श्रेणीत सामील झाला आहे. नवीन स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असून ब्लॅक, ब्लू आणि लेदर ग्रीन असे पर्याय देण्यात आले आहेत. लेदर ग्रीन प्रकाराच्या मागील बाजूस व्हीगन लेदर फिनिश देण्यात आले आहे.
पोको एम८एक्स ५जीच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होते. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे. या फोनची विक्री २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये ६.९ इंचांचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झपर्यंत असून डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिला ग्लास ७आयचे संरक्षण आहे. ओल्या किंवा दमट बोटांनी फोन वापरताना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी वेट टच २.० तंत्रज्ञान देण्यात आले आहे. फोनला आयपी६४ रेटिंग मिळाले आहे. हा फोन अँड्रॉइड १६ आधारित हायपरओएस ३ वर चालतो. कंपनीने चार ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
कामगिरीसाठी पोको एम८एक्स ५जीमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ४ जेन ५ चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट ४ नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित आहे. फोनमध्ये ६ जीबीपर्यंत एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि यूएफएस २.२ स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन १०८०पीपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो.
विशेष म्हणजे, पोको एम८एक्स ५जीमध्ये तब्बल ७,९०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ४५ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि २२.५ वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. उष्णता नियंत्रणासाठी फोनमध्ये ट्रिपल कूलिंग सोल्युशन देण्यात आले असून त्यात मोठा ग्रॅफाइट कूलिंग एरिया, कॉपर फॉइल आणि थर्मल जेलचा समावेश आहे. त्यामुळे मोठी बॅटरी, ५जी कनेक्टिव्हिटी आणि दमदार प्रोसेसर असलेला हा फोन मिड-रेंज ग्राहकांसाठी लक्षवेधी पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule