‘रिगल रेसिपी’तून कोकणच्या खाद्यसंस्कृतीचे जतन - योगेश कदम
रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । कोंढे (ता. चिपळूण) येथील रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि संस्थेचे मार्गदर्शक संजय शिर्के यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या ‘रिगल रेसिपी’ या पुस्तकाचे प्रकाशन गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते झाले. कोक
रिगल रेसिपी प्रकाशन


रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । कोंढे (ता. चिपळूण) येथील रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि संस्थेचे मार्गदर्शक संजय शिर्के यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या ‘रिगल रेसिपी’ या पुस्तकाचे प्रकाशन गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते झाले. कोकणातील पारंपरिक, अस्सल आणि घराघरांत जपल्या गेलेल्या खाद्यपदार्थांचा समृद्ध ठेवा या पुस्तकाच्या माध्यमातून जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले असून, या पाककृती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग सभापती मयूरीताई शिर्के, रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले की, खाद्यपदार्थ म्हणजे केवळ चव किंवा आस्वाद नसून ती त्या समाजाची आणि प्रदेशाची संस्कृती असते. कोकणात काही किलोमीटर अंतरावरही पदार्थांच्या कृती आणि चवींमध्ये बदल जाणवतो. खेडमध्ये ज्या पद्धतीने ओल्या काजूची भाजी केली जाते, त्यापेक्षा सिंधुदुर्गातील पद्धत वेगळी आहे. त्यामुळे अशा पारंपरिक पाककृतींचे दस्तऐवजीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘रिगल रेसिपी’ हे पुस्तक विद्यार्थ्यांनी केवळ कल्पनेतून तयार केलेले नसून गावोगावी व घराघरांत जाऊन जुन्या-जाणत्या व्यक्तींकडून पारंपरिक पाककृती जाणून घेत, त्यातील प्रमाण, पद्धत आणि गुणवत्ता समजून घेऊन तयार केले आहे. त्यामुळे या पुस्तकामागे विद्यार्थ्यांची मेहनत, अभ्यास आणि संशोधन असल्याचे त्यांनी नमूद केले.

रिगल कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याची संधी मिळत आहे, ही कौतुकाची बाब आहे. कोकणातील खाद्यपदार्थांना व्यावसायिक आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेला हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.

कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. समुद्रकिनाऱ्यांसोबतच ताजा मासा, फणसाची भाजी, काजूच्या विविध पाककृतींसह अस्सल स्थानिक पदार्थ हेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. त्यामुळे कोकणातील शाकाहारी आणि मांसाहारी पारंपरिक पदार्थांना व्यापक व्यासपीठ देण्याची आवश्यकता असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.

रिगल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष संजय शिर्के यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. कोकणातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने २००७ मध्ये रिगल कॉलेजची स्थापना करण्यात आली. २००८ मध्ये कोकणातील पहिले हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज सुरू करण्यात आले. १३ एकरच्या भव्य कॅम्पसमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची इमारत उभारण्यात आली असून, संस्थेने विविध अडचणींवर मात करत वाटचाल केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात व्यावसायिक तसेच सीबीएसई शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

संजय शिर्के यांची रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande