
अमरावती, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। शहरातील यंदाची दहीहंडी केवळ उत्सव न राहता राजकीय शक्तिप्रदर्शनाचे मैदान ठरण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा आणि भाजपचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यातील राजकीय मतभेद चर्चेत असतानाच, ६ सप्टेंबरला होणाऱ्या दोन दहीहंडी कार्यक्रमांमुळे या संघर्षाला नवे व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे.
युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने ६ सप्टेंबरला नवाथे चौकात विदर्भस्तरीय दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपच्या वतीने राजकमल चौकात दहीहंडी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकाच दिवशी शहरातील दोन प्रमुख चौकांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने ते प्रथम कोणत्या दहीहंडीला हजेरी लावणार, याबाबत उत्सुकता आहे. विधान परिषद निवडणुकीच्या काळात रवी राणा आणि प्रवीण पोटे पाटील यांच्यातील मतभेद कमी करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा दोन्ही बाजूंकडून राजकीय ताकद दाखविण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दहीहंडीच्या माध्यमातून गर्दी, आयोजन आणि राजकीय प्रभावाची अप्रत्यक्ष कसोटी लागण्याची शक्यता आहे.दोन प्रमुख ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियंत्रण आणि कायदा-मुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे.
कोण दाखविणार ताकद ?दहीहंडीच्या निमित्ताने तरुणांचा उत्साह आणि जल्लोष अपेक्षित असताना त्याला राजकीय रंग किती चढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रवी राणा यांची गर्दी जमविण्याची ताकद आणि प्रवीण पोटे पाटील यांचे भाजपमधील संघटन यांची या निमित्ताने तुलना होणार आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी कोण फोडणार, यापेक्षा राजकीय ताकद कोण दाखवणार, याकडेच अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी